Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरावी अशी घटना ऐन सणासुदीला घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी उतरायला देखील कुटुंब राहिलं नाही.
नेवासे तालुक्यातील वाकडी येथे मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्यू झालेल्या पाच जणांना साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात बुधवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर (१२.३० वाजता) यश आले.
यासाठी एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी पोकलेनचीही मदत घेण्यात आली. गुरुवारी (दि. ११) सकाळी दहाच्या सुमारास घटना घडलेल्या विहिरीजवळच चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकावर सलाबतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी (दि. ९) नेवासा तालुक्यातील वाकडी- धनगरवाडी रस्त्यावर चिमट्याचा मळा येथे पाच जण विहिरीत पडल्याची घटना घडली होती. काळे कुटुंबाची सामूहिक ४५ ते ५० फुट खोल विहीर कोरडी होती.
त्या विहिरीत जनावरांच्या गोठ्यातील शेण-मूत्र, पाणी एकत्र सोडत होते. साधारण १० फुटांपर्यंत शेणाचा थर जमा झाला होता. त्यावर पाचरट पडले होते. तेथे नेहमी घाण वास येत असायचा. परंतु, शेणाचा थर खाली-वर झाल्याने विषारी वायूचे प्रमाण वाढले. यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला.
मंगळवारी (दि. ९) दुपारी विहिरीत पडलेल्या मांजराला काढण्यासाठी दोर बांधून विशाल अनिल काळे हा विहिरीत उतरला. मांजरीला बाहेर फेकले. परंतु, विशाल हा विषारी वायूने बेशुद्ध होऊन विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी वडील अनिल बापूराव काळे खाली उतरले, तेही बेशुद्ध झाले.
नंतर माणिक गोविंद काळे खाली उतरले, तेही विषारी वायूने बेशुद्ध झाले. यामुळे आरडाओरड झाल्याने बाबासाहेब पवार विहिरीत उतरले. त्यांची तीच अवस्था झाली. वडील माणिक काळे यांना वाचविण्यासाठी संदीप काळे उतरले. संदीप काळे यांनी विशाल काळे यांना बाजेवर टाकले.
परंतु, बाज तिरकी होऊन विशाल काळे परत खाली पडले. तसेच विषारी वायूचे प्रमाण वाढल्याने संदीप काळेही बेशुद्ध झाले. नंतर विजय माणिक काळे खाली उतरले. ते बेशुद्ध होऊन त्यांचे डोके खाली जाऊन पाय वर राहिले. त्यांना वाचविण्यासाठी बुधवारी (दि. ९) मध्यरात्रीनंतर १२.३० वाजता एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
पोकलेन मशीनची घेतली मदत
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास विहिरीत पडलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ बचाव पथकाने प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी गळ टाकून विशाल काळे यांचा मृतदेह ९.२५ वाजता बाजेवर टाकून बाहेर काढला. अंधार असल्याने अडचणी येत होत्या.
त्यानंतर ५० फुट पोकलेन मशिन आणण्यात आले. विहिरी सभोवतालची झाडे काढून रस्ता तयार केला. त्यानंतर पोकलेन मतिने रात्री ११.३० वाजता माणिक काळे, बाबासाहेब पवार यांचे मृतदेह बाहेर काढले. मध्यरात्री १२ वाजता संदीप काळे तर १२.३० वाजता अनिल काळे यांचा मृतदेह पोकलेन मशिनच्या सहायाने बाहेर काढण्यात आला.
विशाल पुण्यात नोकरीस, कार्यक्रमानिमित्त आला गावी..
विशाल काळे पुणे येथे नोकरीस होता. घरी जागरण गोंधळ असल्याने तो गावाकडे आला होता. विनोद काळे हा विशालचा भाऊ आहे. तो हैदराबाद येथे नोकरीस होता. त्यांना तीन एकर शेतजमीन आहे. विजय माणिक काळे यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. त्याचा भाऊ अजय माणिक काळे आहे. त्यांना ६ एकर शेती आहे.