अहमदनगर बातम्या

स्थानिकांच्या जाचामुळे आईसह चार बहिणींची हत्या ! युवकाचे कृत्य, व्हिडिओतून मांडली व्यथा

Published by
Mahesh Waghmare

२ जानेवारी २०२५ : उत्तर प्रदेशातील लखनौ शहर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका भयंकर हत्याकांडाने हादरले. स्थानिकांच्या त्रासाला कंटाळून युवकाने आपली आई व चार बहिणींची एका हॉटेलच्या खोलीत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिकांनी आपले घर आणि भूखंड हिसकावून घेतल्याने कुटुंबाला संपविण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नव्हता, असा दावा या २४ वर्षीय आरोपीने व्हिडिओतून केला.

त्याने धर्मपरिवर्तनाची बाबदेखील व्हिडिओत बोलून दाखवली आहे.पोलिसांनी युवकाला अटक केली असून त्याच्या आरोपांचाही तपास सुरू केला आहे.
लखनौमधील हॉटेल शरनजीतमध्ये बुधवारी हत्याकांडाची ही धक्कादायक घटना घडली. कुटुंबातील पाच जणांची हत्या करणाऱ्या आरोपीची ओळख मोहम्मद अरशद अशी पटविण्यात आली आहे.

तो मूळचा आग्रा येथील रहिवासी आहे. मृतांची नावे आलिया (९), अलशिया (१९), अक्सा (१६), रहमीन (१८) आणि त्यांची आई अस्मा अशी आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (मध्य लखनौ) रवीना त्यागी यांनी दिली. प्राथमिक तपासानुसार स्थानिकांसोबत घर आणि जमिनीबाबत असलेल्या वादातून अरशदने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. हत्याकांडाच्या या घटनेनंतर सोशल माध्यमावर अरशदचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.

यात स्थानिकांच्या त्रासाला कंटाळून आई व बहिणींची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.स्थानिकांकडून आपले घर आणि जमीन हिसकावून घेत कुटुंबाचा मोठा छळ केला जात होता. याबाबत अनेकांकडे आपण मदतीची विनंती केली होती. पण कोणीही मदतीला पुढे आले नाही. जवळपास १० दिवसांपासून आम्ही थंडीत फूटपाथवर झोपत होतो.वैध कागदपत्र असतानाही स्थानिकांनी आमचे घर हिसकावून घेतले.

आमच्याकडे ओळखीबाबत १९४७ पासूनचे पुरावे असताना देखील आम्हाला बांगलादेशी म्हणून त्रास देणे सुरू होते.या त्रासाला कंटाळून आपण कुटुंबाला संपवल्याचे अरशदने व्हिडिओतून म्हटले.यात त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बहिणी व आईलादेखील दाखवले आहे.सकाळपर्यंत आपणदेखील जिवंत राहणार नसून व्हिडिओ मिळाल्यानंतर स्थानिकांविरोधात कारवाई करण्याची विनंती त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलीस प्रशासनाकडे केली होती.आपले कुटुंब हिंदू बनण्यासाठी इच्छुक होते.सोबतच आपल्या घराचे फक्त मंदिर बनविण्यात यावे,असा दावा देखील त्याने व्हिडिओतून केला आहे.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.

Published by
Mahesh Waghmare