अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील सारोळा कासार सेवा संस्थेच्या सभासदांच्या मतदार यादीत मोठी अफरातफर झाली असून सेवा संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांनी दिला आहे. सारोळा कासार सेवा संस्थेच्या मतदार यादीवरून तालुक्याचे राजकारण चर्चेत आले आहे.
निवडणूकीसाठी ८५५ कर्जदार सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.त्यावर हरकती घेण्याची मुदत सुरू आहे. त्या यादीत अनेक कर्जदार क्रियाशील सभासदांची नावे आलेली नाहीत, त्यांना न्याय देण्याऐवजी नगर तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून ५२ अक्रियाशील सभासदांना मतदार यादीत घुसविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांनी केला आहे.
सारोळा कासार मध्येही २२ जानेवारी रोजी ८५५ कर्जदार क्रियाशील सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.असून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक क्रियाशील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली नसून, त्या सभासदांना न्याय देण्याऐवजी नगर तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून ५२ अक्रियाशील सभासदांना मतदार यादीत घुसविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप कडूस यांनी केला आहे.
हे ५२ सभासदांच्या नावे जमीन नाही, त्यांना कोणतेही कर्ज देण्यात आलेले नाही असे असताना नाममात्र फी घेत त्यांना सभासद करून घेतले आहे. सेवा सोसायटी सचिवांवर दबाव आणून त्यांच्याकडून अनेक खोटे दाखले तयार करून घेण्यात आले असून, खरे कर्जदार क्रियाशील सभासद मतदानापासून वंचित ठेऊन अक्रियाशील सभासदांना मतदार यादीत घुसविण्याचा प्रयत्न उपनिबंधक कार्यालयाकडून केला जात आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या कलम २७६ नुसार क्रियाशील सभासदांनाच फक्त मतदान करण्याचा अधिकार राहील आणि अक्रियाशील सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही, याचा स्पष्ट उल्लेख असताना उपनिबंधक कार्यालय ‘त्या’ अध्यादेशाचा चुकीचा अर्थ सांगत सारोळा कासार सेवा सोसायटी मतदार यादी बदलू पहात आहे. जो नियम सारोळा कासार सेवा सोसायटीसाठी लावला जात आहे.
तोच नियम तालुक्यातील सर्व सेवा सोसायटी निवडणुकांसाठी लावण्यात यावा.आणि जर अक्रियाशील सभासदांना मतदानाचा अधिकार द्यायचा असेल, तर प्रारूप यादी प्रसिद्ध करते वेळी क्रियाशील आणि अक्रियाशील अशी एकत्रित यादी प्रसिद्ध करावी. प्रारूप यादी जर फक्त क्रियाशील सभासदांचीच प्रसिद्ध करत असाल तर अक्रियाशील सभासद मतदार यादीत का घुसवले जात आहेत हे समजत नाही. या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेही रविंद्र कडूस यांनी सांगितले.