अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-रयत शिक्षण संस्थेत उत्तर विभागातील अहमदनगर जिल्ह्यात नोकरीला लावण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचा दुसरा गुन्हा लोणी येथे दाखल झाला आहे.
एका महिन्यातच रयत शिक्षण संस्थेचे संदर्भातील नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा दुसरा गुन्हा समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फसवणुकीचे सात्रळ कनेक्शन, तर नाही ना असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून चर्चिले जात आहे.
अविनाश सोपानराव शेलार (वय ३५) रा. गणेश कॉलनी, लोणी खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे भाऊ सचिन शेलार व चुलत भाऊ संजय कारभारी शेलार यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये सहा महिन्यांत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याने सात्रळ येथील संजय बापूजी कडू याचे विरुद्ध लोणी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेलार यांनी आपल्या दोन्ही भावांना शिपाई व क्लार्क म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने संजय कडू याने क्लार्कसाठी आठ लाख व शिपाईपदासाठी सहा लाख देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेलार यांनी सुरुवातीला निम्मे व काम पूर्ण झाल्यावर निम्मी रक्कम देण्याचे असे ठरवून सन २०१७ पासून चेक व रोख स्वरूपात कडू यांना सात लाख रुपये दिले.
कडू यांच्याकडे नियुक्तीपत्र व नोकरीची वारंवार विचारणा केली असता सुरुवातीला होईल म्हणून व नंतर टाळाटाळ करत भेटणे व फोन उचलणे बंद केले.
आपली फसवणूक होत असल्याचे शेलार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोणी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी पुढील तपास करत असून या आर्थिक फसवणूक प्रकरणात अनेक मोठी राजकीय नावे समोर येण्याची शक्यता आहे.