Shirdi News : शिर्डीत भाविकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार अनेकदा झाले असून पोलिसांनी गुन्हे दाखल करूनसुद्धा या प्रकारांना आळा घालण्यात अपयश येत आहे. याआधी साईबाबा संस्थानच्या रूम बुकिंगसाठी भाविकांची फसवणूक झाली आहे;
मात्र आता थेट तारांकित हॉटेलच्या रूमची बुकिंग करताना चक्क १ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच शिर्डीत घडली आहे. चेन्नई येथे राहणाऱ्या अनुराधा सी. या महिला भाविक आपल्या मित्रांसमवेत साई दर्शनासाठी आल्या होत्या.
त्यांनी हॉटेल साई श्री येथे रूम घेतल्या. त्यानंतर त्यांना हॉटेल सेंट लॉरेन्स हॉटेलमध्ये रूम घ्यायच्या असल्याने या हॉटेलचा फोन नंबर त्यांनी गुगलवर शोधला. त्यांना एक टोल फ्री नंबर मिळाला. त्या नंबरवर बुकिंगसाठी फोन केला असता अभिनवनामक व्यक्तीने त्यांना व्हॉट्स अॅपवर मेसेज करण्यास सांगितले व आधी १०० रुपये पाठविण्यास सांगितले.
त्यानंतर क्रेडिट कार्डचे डिटेल मागवून ओटीपी मागितला असता तो दिल्यानंतर १०० रुपयाचे पेमेंट रद्द झाल्याचा मेसेज आला व त्याने दिशाभूल करत १ लाख ८७ हजार रुपयांची रिक्वेस्ट पाठवली व ती महिलेच्या लक्षात न आल्याने तिने दिलेल्या ओटीपीनुसार समोरील अभिनव नामक व्यक्तीने सी. अनुराधा यांच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल १ लाख ८७ हजारांची रक्कम गायब केली.
त्यानंतर नंबर ब्लॉक केला. अनुराधा यांच्या लक्षात येताच त्यांनी शिर्डी पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४१९, ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिर्डी पोलिस स्टेशनचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करीत आहेत.