अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कर्जास तारण नसलेल्या जमिनीची बोगस लिलाव प्रक्रिया राबवल्याप्रकरणी सैनिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष, माजी अध्यक्ष, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल करणाऱ्या
पुरुषोत्तम शहाणे व त्यांच्या कुटुंबीयांनी बँकेचा बनावट शिक्का तयार करून पैसे भरणा केल्याच्या बनावट पावत्या तयार करत फसवणूक केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांनी दिली.
पारनेर न्यायालयात बँकेने दावा दाखल केल्यानंतर शहाणे याने न्यायालयासमोर तडजोड करून कर्जाची रक्कम जमा केली. फिर्याद दाखल करणाऱ्या शहाणे व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सैनिक बँकेकडून २००२ मध्ये कर्ज घेतले होते.
२००५ मध्ये सर्व कर्ज थकबाकीत गेल्यानंतर शहाणे याने बँकेत रोख रक्कम जमा केल्यासंदर्भातील रोखपालाचा बनावट शिक्का तयार करून घेतला. बँकेत रक्कम जमा केल्याच्या बनावट पावत्या तयार करून सहकार न्यायालयात पैसे जमा करण्यात येऊनही बँकेकडून कर्जाची मागणी होत असल्याचा दावा दाखल केला.
शहाणे याने दाखल केलेल्या दाव्याचे समन्स बँकेस मिळाल्यानंतर त्याने बनावट शिक्के, तसेच बनावट पावत्या तयार केल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर बँकेने पारनेरच्या न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला. बँकेने सहकार न्यायालयात कलम ९१ अन्वये वसुलीसाठी दावा दाखल केला होता.
२००९ मध्ये दाव्याचा निकाल लागल्यानंतर बँकेने २०११ मध्ये मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबवली. लिलावातून ८ लाख ७५ हजार वसूल झाल्यानंतर मार्च २०१४ पूर्वी कर्जाची उर्वरित रक्कम भरण्याची तयारी दशर्ववून दावे मागे घेण्याची विनंती शहाणेने केली.
न्यायालयासमोर तडजोड करून शहाणेच्या विरोधातील दावा मागे घेण्यात आला. शहाणेने पुन्हा बँकेनेच फसवणूक केल्याची फिर्याद पोलिसात दाखल केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved