अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. 3 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघाच्या वतीने मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर सेवा संघाच्या लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड येथील जिल्हा संपर्क कार्यालयात संपन्न होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन माळी सेवा संघाचे उपाध्यक्ष मेजर नारायणराव चिपाडे यांनी केले आहे.
या मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीराचे उद्घाटन माजी लेफ्टनंट सदाशिवराव भोळकर, अॅड. महेश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. भानुदास होले, सूर्यकांत रासकर, पोपटराव बनकर, किरण सातपुते, अॅड. अनिता दिघे, जालिंदर शिंदे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीरात गुडघेदुखी, सांधेदुखी, मायग्रेन, मनके विकार, कंबर व टाचदुखी आदिंची तपासणी तज्ञ डॉक्टर करणार आहे.
या शिबीरासाठी नांव नोंदणी आवश्यक असून, सेवा संघाच्या संपर्क कार्यालयात शिबीराच्या लाभार्थ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले आहे.