अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीच्या वतीने तर मॅक्सिमस स्पोटर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या अहमदनगर रिपब्लिक 2020 फुटबॉल कप स्पर्धेत 2 गोलने फ्रेंडस एफसी संघाने शिवाजीयन्स संघावर दणदणीत विजय मिळवला. सावेडी येथील आनंद विद्यालयाच्या मैदानात फुटबॉलचा थरार रंगला होता.
अंतिम सामना फ्रेंडस एफसी विरुध्द शिवाजीयन्स यांच्यात अत्यंत अटातटीचा झाला. शेवटच्या टप्प्यात 2 गोल करुन फ्रेंडस एफसी संघाने विजय संपादन केले. शेवटच्या क्षणापर्यंत हा चुरशीचा सामना रंगला होता. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
विजेत्या फ्रेंडस एफसी संघास चषक, मेडल, 11 हजार रु. रोख व उपविजयी संघास चषक, मेडल, 7 हजार रु. चे बक्षिस जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे व नमोह फाऊंडेशनच्या नमिता फिरोदिया यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबू काकडे, केतन क्षीरसागर, सुब्रमण्यम भोस उपस्थित होते.
तसेच या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर- फैजल शेख (एमकेसी परभणी), बेस्ट स्ट्राईकर- शुभम काळे (फ्रेंडस एफसी), बेस्ट डिफेन्स- प्रसाद गांगर्डे (फ्रेंडस एफसी) या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले होते. यामध्ये पुणे, परभणी व औरंगाबादच्या संघांनी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे म्हणाल्या की, फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीचे कार्य उत्तम चालू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना उत्तम व्यासपीठ निर्माण झाले आहे. खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन रुजत असून, अशा स्पर्धा व्यापक स्वरुपात होण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे पुर्णत: सहकार्य असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नमिता फिरोदिया यांनी फुटबॉल या खेळात शहरातील अनेक खेळाडू पुढे येत असून, त्यांना प्रोत्साहन व दिशा देण्याचे कार्य चालू असल्याचे सांगून, स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सावेडीत 2002 पासून फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमी कार्यरत आहे.
नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अकॅडमीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तसेच अकॅडमीच्या वतीने गरजू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण उपलब्ध करुन खेळाचे साहित्य देखील देण्यात येत असल्याचे अकॅडमीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक नायर यांनी केले.
आभार अमरजीयसिंग साही यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीचे डॉ.संजय गायकवाड, डॉ.राजमाने, आकाश दंडवते, अॅड.प्रसाद गांगर्डे, ओमकार म्हसे, बिजू टायरवाले, हर्षल बांगर, कमलेश ठाकूर, किरण बारस्कर, अक्षय बोराडे, जयंत जराड, कृष्णा महातो, रोहन कनोजीया, राजवीर साही, प्रशांत पठारे यांनी परिश्रम घेतले.