अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 करोना रूग्णांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकार्यांनी रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी नांदगावकर यांनी प्रशासनासह सरकारवर देखील टीका केली आहे.
रुग्णालयाला दोन कोटी 60 लाखांचा निधी देण्यात आला नव्हता. 11 लोकांचे प्राण गेल्यानंतर सरकारकडून निधी देण्यात आला, यात सरकारची बेजाबदारी समोर येते.
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी बांधकाम विभागाकडून चांगल्याप्रकारे काम करून घेतले नाही. ते जेवढे या आगीला जबाबदार आहेत, तेवढेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जबाबदार आहे.
सरकारने चौकशी समिती नियुक्त केली असली तरी या दोन्ही अधिकार्यांचे निलंबन करून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात वेळोवेळी सरकारी रूग्णालयांना आग लागलेल्या घटना घडल्या आहेत, सरकार फक्त चौकशी करते, दोषीवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन देते. पण यामध्ये कोण दोषी आहे, हे आधी शोधा, असेही नांदगावकर म्हणाले.