केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची शहरातून अंत्ययात्रा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारने शेतकर्‍यांवर लादलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा पर्यंन्त शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तर युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, अंकुश शेळके, संदीप पुंड, देवेंद्र कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत, शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिल्पाताई दुसुंगे, अमन तिवारी, गणेश भोसले, सुजय गांधी, योगेश घाडगे, आशिष गुंदेचा, शंकर जगताप, अनिश पाटोळे, आकाश साळवे, विठ्ठल गजभिये आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास अहमदनगर जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

तर शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी करीत मंगळवार दि.8 डिसेंबरच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे म्हणाले की, भाजप सरकार आडमुठी भूमिका घेऊन शेतकर्‍यांशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविण्यास तयार नाही.

हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना देखील केंद्र सरकार हे आंदोलन दडपण्याच्या तयारीत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न न सोडवता, मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकरी विरोधी काळे कायदे पारित करण्यात आल्याचे सांगितले. युवक शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांनी शेतकरी जगला तर देश टिकेल.

शेतकरी विरोधात कायदे पारित करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रकार भाजप सरकार करीत आहे. भाजप सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले असून, भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचे सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24