Ahmednagar News : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेल्या सहकार्याची जाणीव गणेशच्या कामगारांना आहे. त्यामुळे कामगारांना राजकारणात आणि अर्थकराणात न ओढता कराराप्रमाणे सर्व अर्थिक व्यवहार गणेश कारखान्याने आधी पूर्ण करावेत,
असे आवाहन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात तांबे यांनी म्हटले आहे की, डॉ. विखे पाटील कारखाना आणि गणेश कारखान्यात झालेल्या पाच वर्षातील कराराच्या बाबतीत लवादापुढे काही निर्णय व्हायचे आहेत.
याबाबत असलेले अर्थिक मुद्दे निकाली निघावेत हा प्रयत्न आहे. कारण ज्यांनी यापूर्वी कामगारांचे पैसे बुडवले ते डॉ. विखे पाटील कारखान्याचे पैसे बुडविण्यासही मागे पुढे पाहाणार नाहीत,
त्यामुळे झालेल्या कराराप्रमाणे गणेशच्या संचालकांनी आधी व्यवहार पूर्ण करावेत यासाठी डॉ. विखे पाटील कारखान्याने पत्र दिले आहेत. त्यामुळे गणेश कारखान्याचे कर्ज प्रकरण बँकेने थांबवावे किंवा कर्ज प्रकरणाला विखे कारखान्याची हरकत असण्याचे कोणतेही कारण नाही.
गणेश कारखान्याला संगमनेर आणि संजीवनीचे नेते मदत करणार असल्याचे संचालक मंडळाकडून सांगितले जात असेल तर गणेश कारखान्याला कर्ज काढण्याची गरज काय, असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला.
गणेश कारखाना ८ वर्ष चालविताना एकाही कामगाराचा पगार डॉ. विखे पाटील कारखान्याने थकविलेला नाही. उलट पूर्वीच्या संचालक मंडळाने थकविलेले २७ महिन्यांचे पगार डॉ. विखे पाटील कारखान्याने केले याची जाणीव कामगारांना आहे. डॉ. विखे पाटील कारखान्याशी असलेला करार अद्यापही रद्द नाही.
त्यामुळे गणेश कारखाना कर्ज कोणाच्या नावाने घेणार याची कोणती स्पष्टता कराखान्याचे संचालक करायला तयार नाहीत. आता कारखाना चालविण्यात येत असलेले संचालकांचे अपयश उघड होवू लागल्याने कामगारांचा उपयोग करून संचालकांना राजकारण करणे सुचले हे अत्यंत दुर्दैवी आहे.
परंतु या अर्थकारणात आणि राजकारणात कामगारांना ओढू नये. उलट संगमनेर आणि संजीवनीच्या मार्गदर्शकांकडे कर्ज काढून गणेश कारखाना चालविण्याचा आग्रह कामगारांनी धरावा असे आवाहन तांबे यांनी पत्रकात केले आहे.