Ahmednagar News : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील (ता. (जुन्नर) नळावणे येथील खंडोबा मंदिर तसेच त्या शेजारी रामेश्वर मंदिर व जेजुरी लिंग मंदिर आणि अहमदनगर जिल्ह्यातील (ता. संगमनेर) अकलापूर येथील दत्त मंदिर येथे चोरी करणाऱ्या,
घरफोडी, इतरही गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची पाच जणांची टोळी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडून पोलिसांनी मंदिरांमधून चोरलेले साहित्य, इतर साहित्य, एक चारचाकी, तीन दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत.
सचिन गंगाधर जाधव (रा. औरगांबाद), किरण सुनील दुधावडे (रा अकलापूर, ता. संगमनेर), सुरेश पंढरीनाथ पथवे, सुनील उमा पथवे (दोघेही रा. धामणगाव आवारी, ता. अकोले), नवनाथ विजय पवार (रा. मांडवे, ता. संगमनेर) अशी पकडलेल्या पाच जणांची नावे आहेत.
नळावणे येथील खंडोबा मंदिर तसेच त्या शेजारी रामेश्वर मंदिर व जेजुरी लिंग मंदिर येथे १९ जुलै रात्री ८:३० ते २० जुलै १२:३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी खंडोबा मंदिराचे प्रवेशद्वार तोडून चोरीचा प्रयत्न केला.
रामेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे आणि जेजुरी लिंग मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून दानपेटी, मंदिरातील घंटा चोरून नेला होता. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलिस पथकाने गोपनीय माहिती मिळवून ते जाधवपर्यंत पोहोचले.
त्याला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा किरण दुधावडे, सुरेश पथवे, सुनील पथवे आणि नवनाथ पवार या त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे पोलिसांना सांगितले. आळेफाटा पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी आळेफाटा पोलिस ठाणे, जुन्नर पोलिस ठाणे, घारगाव पोलिस ठाणे अशा नऊ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अकलापूर (ता. संगमनेर) येथील दत्त मंदिरात चोरी केल्याची कबुली पकडलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांनी दिली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, या दत्त मंदिरात यापूर्वीही चोऱ्या झाल्या आहेत. मात्र, त्याचा तपास घारगाव पोलिसांना लावता आलेला नाही.
आळेफाटा पोलिसांनी पकडलेल्या पाच जणांपैकी चौघे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यातील आहेत. त्यामुळे घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही त्यांना अट्टल गुन्हेगारांपर्यंत पोहोचता आले नाही, हे घारगाव पोलिसांचे अपयश आहे का?, अशी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात चर्चा आहे.