अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- सैन्यदलातील भरतीसाठी शाळेचे बनावट दाखले व निकालपत्रे तयार करुन देणारी टोळी पाथर्डी येथे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाल शेवगाव उपविभागीय पो.अ. सुदर्शन मुंढे, स्थागुशा पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिलेटरी इंटेलिजन्स (देवळाली कॅम्प, नाशिक) यांनी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय, अहमदनगर येथे पोनि अनिल कटके यांची भेट घेवून माहिती दिली कि, पाथर्डी शहरातील शनिचौक ते नाथनगर जाणारे रस्त्यालगत मारुती शिरसाठ व त्याचे काही साथीदार हे पैसे घेवून शाळेची बनावट कागदपत्रे तयार करुन देतात व सदर कागदपत्रांच्या आधारे काही युवकांनी सरकारी नोकऱ्या मिळविलेल्या आहेत.
अशी खात्रीशीर माहिती मिळाली असून त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करावयाची आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून पाठवले असता माहिती खरी ठरली. बनावट ग्राहकाने शनि चौक ते नाथनगर जाणारे रस्त्याचे कडेल असलेल्या एका दुमजली इमारती मध्ये जावून मारुती सिरसाठ यास २००० रु. देवून त्याचेकडून बनावट शाळेचा दाखला तयार करुन घेवून पथकातील अधिकारी व अंमलदार यांना इशारा केला.
त्याचवेळी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले. १) मारुती आनंदराव शिरसाठ (वय ५२, रा. जांभळी, ता. पाथर्डी, दत्तू नवनाथ गर्जे (वय ४०, रा. अकोला, ता. पाथर्डी) असे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी सदर ठिकाणची झडती घेतली. त्या ठिकाणहू अनेक दाखले, लेटरपॅड, शिक्के, संगणक व प्रिन्टर मशिन असा एकूण ४९ हजार रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या वरील नमुद इसमांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कुंडलीक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), मच्छिन्द्र निकम ( रा. मानूर, ता. शिरूर कासार, जि. बीड)
असे आम्ही बनावट कागदपत्रे तयार करुन देत असून यापूर्वी अजय उर्फ जय राजाराम टिळे, (रा.वाडीवरे, ता. इगतपूरी, जि.नाशिक) व शांताराम पंढरीनाथ अनाथे (रा. पिंपळद, ता. जि. नाशिक) यांना सैन्यदलामध्ये नोकरी मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचे बनावट दाखले तयार करुन दिले असल्याचे सांगितले.
आरोपी यांनी वनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन ते खरे असल्याचे भासवून त्याचा गैरवापर करुन सैन्यदलामध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केलेली असल्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.