Ahmednagar News : दूध दरवाढी संदर्भात राज्यभरामध्ये मागील दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. दुधाला प्रति लिटर ४० रुपये दरवाढ मिळावी ही दुध उत्पादक शेतकऱ्यांसह आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह दुग्धविकास विभागाचे आयुक्तांसह शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत.
मात्र या बैठकांमध्ये कुठलही ठोस आश्वासन शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन सुरूच आहेत. दरम्यान आता या आंदोलनात शिवसेनेने ( उद्धव ठाकरे) उडी घातली असून, दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने शिर्डीत दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. तसेच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला साईबाबा सद्बुद्धी देऊन शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रुपयांचा दर मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सध्या मिळत असलेला दुधाला दार व होत असलेला खर्च पाहता दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव देण्यात यावा, पशुधनाचा चारा, खाद्य व औषधे महाग झाल्याने सध्या देण्यात येत असलेला दुधाचा दर व पशुधनाचा खर्च याचा आर्थिक ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय समजला जाणारा दूध व्यवसाय अडचणीत आल्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडला आहे.
येत्या आठ दिवसांत दुधाला किमान चाळीस रुपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन कोते यांनी यावेळी दिला.
आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे, सुहास वहाडणे, नाना बावके, सावळेराम डांगे, पुंडलीक बावके, सुयोग सावकारे, अक्षय तळेकर, दिनेश शिंदे, नितीन अशोक कोते, साई बडगुजर, मयुर शेर्वेकर, प्रसाद पाटील, अमर गायकवाड, संतोष कटारे, ऋषी मते, किरण जपे, कैलास शिंदे, विश्वजीत बागुल, संदीप बावके आदींची यावेळी उपस्थिती होती.
नगरपरिषद कार्यालयासमोर नगर-मनमाड महामार्गालगत हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान ना. विखे पाटील यांचा पुतळ्याला दुधाने अंघोळ घालणार असल्याची बाब अत्यंत गोपनिय ठेवण्यात आली.
गाडीच्या डीकीतून अचानक प्रतिकात्मक पुतळा काढून त्यावर दूध टाकण्यात आले. यावेळी राज्य सरकार व विखे पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.