अहमदनगर बातम्या

गॅसच्या पाईपलाईनचे काम देतेय वाहन अपघाताला निमंत्रण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर-औरंगाबाद महामार्गालगत सीएनजी गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू असून यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर व्यावसायिक देखील यामुळे त्रासले गेले आहे.

अगोदरच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांवर गॅसच्या पाइपलाइनच्या कामामुळे मोठे संकट ओढवले आहे. गॅस पाईपलाईन साठी मोठा चर खोदण्यात आले आहे.

खोदून ठेवलेला चर दोन-दोन महीने आहे त्या अवस्थेत ठेवण्यात आल्याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पाईपलाईन साठी खोदण्यात आलेल्या चरा मुळे शेतकऱ्यांचे गहू, कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांची फळझाडे ही तोडण्यात आलेली असल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

पाईपलाईनचे काम चालू असताना अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात येते. एक बाजू बंद केल्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

तसेच पाईपलाईनचे काम करत असलेली वाहने रस्त्यात मध्येच उभी असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जेऊर परिसरातील शेतकरी संतापले असून नुकसान भरपाई मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांसह जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office