Ahmednagar News : गौतमी पाटील व तिचा कार्यक्रम घेण्यासाठी अनेक ठिकाणी वरचढ लागलेली असते. तिच्या कार्यक्रमाला नेहमीच गर्दी होते. त्यामुळे तिचा कार्यक्रम आयोजित करण्यावर गाव पुढारीही भर देतात. परंतु तिच्या कार्यक्रमासाठी आधी पोलिसांची परवानगी हवी असते. आता अकोले तालुक्यात पोलिसांनी एक राज्याला दिशादर्शक असा प्रयोग राबवला.
अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथे गौतमी पाटीलचा डान्स ठेवला, पोलिसांनी परवानगी नाकारली. परवानगी पाहिजे तर रानावनातून येणाऱ्या मुलींना सायकली वाटा अशी अट ठेवली. गावापुढऱ्यांनीही ती झटपट मान्य करत गरजू मुलींना सायकल वाटप केले. यातून तब्बल ६२ मुलींना सायकली मिळाल्या. हा प्रयोग महाराष्ट्राला दिशादर्शक असाच आहे.
अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथे माघ पौर्णिमेला खंडोबा यात्रा भरते. दरवर्षी या यात्रेत तमाशा असतो. यंदा गौतमी पाटील याना येथे आणायचे ठरले. यात अकोले पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी कार्यक्रम परवानगी नाकारली. नेहमी प्रमाणे नेत्यांचे फोन सुरु झाले. मग करे यांनी आठ दिवसांत मी सांगेल तितक्या सायकली द्या असे सांगितले.
गाव पुढारी तयार झाले. त्यानंतर मग पोलिस निरीक्षक करे यांनी शाळेत जाऊन मुलींच्या घराचे अंतर विचारले. पंच्याहत्तर मुली वाडी वस्तीवरून पायी येतात. त्यांची यादी केली. गावात माझा गाव माझा स्वाभिमान ग्रुप तयार झाला. दानशूरांनी बासष्ट सायकली दिल्या. त्यांची किंमत दीड लाखाच्या घरात आहे. या सायकली मुलींना वाटण्यात आल्या. या अनोख्या शक्कल लावल्याने ६२ गरजू मुलींना सायकली मिळाल्या.
उपक्रमाचे कौतुक
करे यांनी राबवलेल्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जनतेसह सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे. विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी म्हटले आहे की, काही सांस्कृतिक कार्यक्रमात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, मात्र गावाने हाच कार्यक्रम सामाजिक चौकटीत नेला तर मनोरंजन आणि सामाजिक भान जपता येते. पोलिस निरीक्षक विजय करे यांनी महाराष्ट्राला दिशा देणारा उपक्रम राबविला. असे उपक्रम इतर ठिकाणी राबवता येतील असे त्यांनी म्हटले आहे.