अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे सुरू आहे. तेव्हा शिक्षक बँकेची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली तर शिक्षकांचे पगार लवकर करण्यात येतील, सुट्ट्या जादा देण्यात येतील, नियमित पगारासाठी प्रशासन सहकार्य करील.
तेव्हा सर्व शिक्षक संघटनांनी याचा विचार करावा असे मिश्किल आवाहन राज्याचे शिक्षण सह संचालक दिनकर टेमकर यांनी केले.
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालक म्हणून बढती व बदली झाल्याबद्दल त्यांचा तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे आदींचा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षक बँकेच्या भा.दा. पाटील सभागृहांमध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन टेमकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोणामुळे सध्या दरमहा राज्य शासनाकडून अनुदान मिळत असते. त्यामुळे पगार मागे पुढे होतात. केंद्रप्रमुख भरतीबाबत आपण पन्नास टक्के सरळ सेवा व पन्नास टक्के पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. शाळा स्तरावर वेगवेगळ्या समित्या कमी करून फक्त शाळा व्यवस्थापन समिती व परिवहन समिती ठेवावी अशी शिफारस केली आहे.
जिल्ह्याला धावणारे नाही तर समजून घेणारे अधिकारी लाभले आहेत. काटमोरे यांनी चांगले काम केले आहे. भविष्यातही ते त्यांच्या कार्याने नावलौकिक मिळवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नूतन शिक्षण उपसंचालक रमाकांत काटमोरे यांनी आपल्या जिल्ह्यात काम करण्याचा आनंद काही औरच असतो.
प्राथमिक शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी या सर्व पदांवर जिल्ह्यात काम करताना सर्वांचे मोलाचं सहकार्य मिळालं. अनेक उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने राबविण्यात आले याचे समाधान मला आहे. काव्यरंग पुस्तिका, क्रीडा स्पर्धा, स्वाध्याय पुस्तिका, काव्यवाचन स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा उपक्रम राबविले.
शिष्यवृत्ती परीक्षेचा गेल्या तीन वर्षात दहा टक्के निकाल वाढला. 26 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असेही ते म्हणाले. शिक्षकांचा दरमहा पगार उशिरा होण्यास अनेक कारणे आहेत. त्याला फक्त शिक्षण खाते जबाबदार नाही. अर्थ खात्यामुळे उशीर होतो असे सांगून त्यांनी या सर्व कारणांचा ऊहापोह केला.
प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी सुद्धा सर्वांच्या सहकार्याने हा भार पेलू असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने व त्यांच्या खुसखुशीत भाषणाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आली. संजय कळमकर, राजू साळवे यांनी आपल्या विनोदी शैलीमध्ये मतप्रदर्शन केले.
सलीमखान पठाण यांच्या शेरोशायरी ने कार्यक्रमात रंग भरला. यावेळी आबा लोंढे, राजू राहणे, संजय धामणे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे, कल्याण लवांडे, दादा वाघ, साहेबराव अनाप, बापूसाहेब तांबे, के.आर. ढवळे, संजय पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा ऊहापोह या वेळी करण्यात आला.
टेमकर व काटमोरे यांच्या रूपाने जिल्ह्याचे भूमिपुत्र वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. बाळासाहेब चाबुकस्वार यांच्या पुढाकाराने सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन एक चांगला कार्यक्रम पार पाडल्याबद्दल बापूसाहेब तांबे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी केले. आभार नितीन पंडित यांनी मानले. शिक्षक परिषद वगळता जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शिक्षक बँकेचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.