मागासवर्गीय कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लँड माफियाला तडीपार करावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर जातीयद्वेषातून हल्ला करणार्‍या लँड माफिया दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांना तडीपार करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल व्हावा.

व अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, विधानसभा अध्यक्ष प्रतिक जाधव, शहराध्यक्ष संतोष जाधव, विधानसभा बीव्हीएफ अतुल काते उपस्थित होते. 15 डिसेंबर रोजी निर्मलनगर शिरसाठ मळा येथील मंदा अरुण ठोकळ यांच्या नातवाचा वाढदिवस होता.

त्यादिवशी आरोपी दीपक सावंत व त्याचे साथीदार अक्षय थोरवे, तुषार थोरवे, गजानन सावंत व इतर दहा ते पंधरा साथीदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. खालच्या जातीच्या लोकांनी या भागात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही असे धमकावले. कार्यक्रम सुरु असल्याचा राग धरुन लँड माफिया दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांनी ठोकळ कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये अरुण ठोकळ हे गंभीर जखमी झाले असून, ते एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तसेच ठोकळ कुटुंबीयातील महिलांना देखील मारहाण झाली आहे. आरोपींनी ठोकळ कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करून, त्यांच्या घराची नासधूस केली व त्यांची सहा वाहने जाळण्यात आली.

आरोपी हे गुंड व जातीयवादी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याकडून ठोकळ कुटुंबीयांना धोका आहे. तरी लँड माफिया दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांना तडीपार करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल व्हावा व अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24