Ahmednagar News : सध्या ऑनलाईन सुविधेमुळे अनेक कामे तुम्ही घरबसल्याच करू शकता. यात कोणत्याही वस्तू आपण घरात बसून ऑर्डर करता येतात. अगदी पैसे देखील ऑनलाईन सुविधेमुळे सहज एक खात्यावरून दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर करू शकतो.
परंतु घरात वृद्ध असतात त्यांना ऑनलाईन सुविधेचा वापर करता येत नाही. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर त्यांनी ओळखीच्या व्यक्तीची मदत घेणे गरजेचे आहे. कारण बहुतेक वेळा अनोळखी व्यक्तीकडून त्यांची अनेकदा फसवणूक होते. अशीच घटना नगर शहरात घडली आहे.

एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करत खात्यातून ४० हजार रुपये काढून घेत, त्या महिलेची फसवणूक केल्याची घटना नगर शहरातील मार्केट यार्ड चौकाजवळ असलेल्या नेवासकर पेट्रोल पंपाच्या आवारात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये शनिवारी (दि.१३) दुपारी घडली.
फसवणूकीची ही घटना लक्षात आल्यावर महारुख बिकाणी श्रॉफ (वय ६५, रा. भाग्योदय कॉलनी, दमानिया बंगल्यामागे, जामखेड रोड) यांनी रविवारी (दि.१४) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली.
फिर्यादी महारुख बिकाणी श्रॉफ या शनिवारी दुपारी २ च्या सुमारास नेवासकर पेट्रोल पंपाच्या आवारात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांना एटीएम मधून पैसे काढताना अडचण आली.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना मदत करण्याचा बहाणा करत त्यांच्या कडील एटीएम कार्ड घेतले. व त्यांना दुसरे कार्ड देवून त्यांच्या कार्डद्वारे त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. ही बाब रविवारी (दि. १४) त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे.