Ahmednagar News : सोनईत दोन महिन्यांत साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यू आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी रात्री १७ वर्षीय प्रणिता नंदु काकडे या मुलीचा डेंग्यूने मृत्यु झाल्याने सोनई आरोग्य विभाग व प्रशासनावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
नंदु काकडे हे छोटासा व्यवसाय चालवत पत्नी, मुलगा व मुलीसह विठ्ठल मंदिर परिसरात राहतात. काही दिवसांपासून प्रणिता व तिची आई आजारी असल्याने त्यांच्यावर सोनईत खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
डॉक्टरांनी रक्त लघवीसह सर्व तपासण्या केल्या यात डेंग्यू आजाराचे निदान झाले. आजाराला गुण येत नसल्याने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रणिताची प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते.
मात्र दरम्यान गुरूवारी प्रणिताचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाची बळी हि मुलगी ठरल्याचे ग्रामस्थात बोलले जात आहे. सोनई येथील आरोग्य विभागात तीन वैद्यकीय अधिकारी आहेत.
तीन अधिकारी असूनही त्यांची आरोग्य केंद्रात येण्या जाण्याची वेळ निश्चित नाही. त्यात रोज एकच अधिकारी हजर असतात. डॉक्टर येण्यापर्यंत रूग्णाला ताटकळत बसावे लागते. डॉक्टर आल्यानंतरही तपासणी झाल्यानंतर बऱ्याच वेळा हॉस्पिटलकडे औषधे शिल्लक नसल्याचे सांगत औषधे बाहेरून घेण्याचे सांगितले जाते.
मग आलेले औषधे कुठे गायब होतात अशा तक्रारी ग्रामस्थांनी यावेळी केल्या. याच कारणाने गरीब रूग्ण परिस्थिती नसतानाही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पोटाला चिमटा घेऊन भरमसाठ पैसे खर्च करत असल्याचे सांगतात.
दोन महिन्यापासून परिसरात अनेक रुग्ण डेंगू वर उपचार घेत आहे. डॉक्टर लॅबमध्ये रक्ताचे सॅम्पल पाठवतात. लॅबमधून एका किटच्या सहाय्याने स्टेटस अॅक्टिव्ह, नॉन अॅक्टिव्ह असा रिपोर्ट देतात.
या आधारावर डॉक्टर डेंगू आहे की नाही हे रुग्णाला सांगतात. याविषयी माहिती घेतली असता या किटची १००% खात्री नसल्याचे जाणकार सांगतात मग डॉक्टर कोणत्या आधारे पेशंटला डेंगूचे उपचार देतात असा प्रश्न उपस्थित केला जातो.
प्रणिताचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मृत्यूची बातमी गावात कळताच ग्रामस्थांना धक्का बसला. गावातील आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.