अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-मातंग समाजाला स्वतंत्र सात टक्के आरक्षण द्यावे व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शनं करून करण्यात आली.
राज्यात मातंग समाजाची सुमारे 70 लाखांहून अधिक संख्या आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील 13 टक्के आरक्षण पैकी 7 टक्के आरक्षण मातंग समाजाला द्यावा.
मातंग समाजाची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही, दलित समाजासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दीडशेपेक्षा अधिक योजना मंजूर केल्या आहेत.
परंतु सदर योजनेचा लाभ आरक्षणातील प्रमुख जातींनी घेतला आहे म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन त्याचे अ.ब.क.ड. अनुसार वर्गीकरण करण्यात यावे अनेक वर्षापासून राज्यातील अनेक संघटना आरक्षणासाठी विविध स्वरूपाचे आंदोलन करत आहेत.
बीड जिल्ह्यातील केज येथील मातंग समाजाच्या संजय ताकतोंडे या युवकाने मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेऊन आपले जीवन संपविले. विविध अनेक संघटनांनी मोर्चे काढले, परंतु सरकार मातंग समाजाची दखल घेण्यास तयार नाही.
त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मातंग समाजाला स्वतंत्र सात टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जातीतील एकूण 59 जातीचे अ.ब.क.ड.अनुसार वर्गीकरण करण्यात यावे. यांसह अनेक प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.