अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वयाची पन्नाशी गाठलेल्या आजच्या पिढीने कधीच पाहिला नाही असा पाऊस यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून होतोय. सुरुवातीला तो चांगला वाटला. खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या.
कुणालाच वाटलं नाही आज चांगला वाटणारा पाऊस पुढे नकोसा होईल. पावसाळा सुरू होऊन शंभर दिवस झालेत.यावर्षी काही ठिकाणी साठ दिवस पाऊस झाला आहे. तोही अनेकदा ढगफुटीसारखा.ओढे नालेही वाहून वाहून थकून गेले आहेत.सगळी धरणं भरली.नद्यांना भरपूर पाणी वाहिले.जिरायत भागात गेल्या
तीस चाळीस वर्षांत कधीच भरली नव्हती असे बंधारे आणि तलाव दोन-तीन वेळा भरून त्यांच्या भिंतीवरून पाणी वाहत आहे. जिरायती भागातील विहिरींचे पाणी जमिनीच्या पातळीपर्यंत आले आहे.विंधन विहिरीतून आपोआप पाणी बाहेर पडत आहे.यावर्षीच्या अधिकच्या पावसाने अनेक शेतकर्यांना दुबार पेरणी करण्यास भाग पाडले.
आता खरीप पिकांची काढणी सुरू झाली असताना अधिकच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला नव्हता. शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, मूग घास या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाउसाने डाळिंब फळाचेही नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.
तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ते बळीराजासाठी काही नवीन नाही. पाऊस जास्त पडला तरी नुकसान आणि कमी पडला तरी नुकसान ही चक्र बळीराजाच्या आयुष्यातून कधीच जात नाही.
आता सरकार आदेश देईल आणि पंचनाम्याचा फार्स नेहमीप्रमाणे होईल.कागद तयार होतील आणि तसेच पडून राहतील.विरोधी पक्ष अव्वाच्या सव्वा भरपाईची मागणी करेल आणि सरकार करोनामुळे तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगून करू,पाहू म्हणत वेळ मारून नेईन. परंतु बळीराजा यातूनही मार्ग काढत जिद्दीने पुन्हा उभा राहील…पुन्हा उभा राहील…पुन्हा उभा राहील.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved