अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे घोड, विसापूर आवर्तन सोडण्याच्या वेळापत्रकात जलसंपदा विभागाला बदल करावा लागला आहे. घोड व विसापूरचे आवर्तन २५ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
घोड, विसापूरचे आवर्तन २५ जानेवारीला सोडण्याबाबत संबंधित उपअभियंत्यांना आदेश दिले आहेत. विसापूरचे आवर्तन सोडण्यापूर्वी सोमवारी सकाळी पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक घेऊन नियोजन करण्यात येईल,
अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी दिली. विसापूरचे १ फेब्रुवारीपासून तर घोडचे आवर्तन १० फेब्रुवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीराव पाचपुते, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिल पाचपुते, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी घोडचे आवर्तन लवकर सोडावे यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.