Ahmednagar News : पीककर्ज घेणाऱ्या सभासदांना एक खुशखबर आहे. मार्चअखेरपर्यंत ३ लाखांपर्यंतच्या मुद्दल रकमेवरील व्याज शेतकऱ्यांना परत करण्यासाठी सोसायट्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले होते. आता बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत जो वरील निर्णय घेण्यात आलाय या निर्णयाचा फायदा १.३६ लाखांवर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना होईल.
बँकेला सुमारे १३० कोटींचे व्याज परत करावे लागणार आहे. बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या माहितीनुसार, सहकार आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकातील सूचनेनुसार हे व्याज परत केले जाणार आहे. १ ते ३१ मार्च दरम्यान पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकरी,
कर्जदार सभासदांना त्यांनी भरलेले व्याज परत करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेचे सर्व शाखाधिकारी व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्थांना सविस्तर परिपत्रकाद्वारे पीककर्ज व्याज वसुली २२ एप्रिल अगोदर जमा करण्याच्या सूचना केल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
शासनाने केली बँकेची कोंडी
तीन लाखापर्यंतच्या पीककर्जास शुन्य टक्के व्याजदराचा लाभ दिला जातो. परंतु, सभासदांकडून सोसायट्या हे व्याज वसूल करतात. त्यानंतर राज्य व केंद्राकडून व्याजाचा परतावा आल्यानंतर सभासदांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो.
मागील तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून सुमारे ९९ कोटी ७५ लाखांचा परतावा येणे बाकी आहे, तर केंद्राकडून सुमारे ४९ कोटी ६६ लाख येणे बाकी आहे. त्यामुळे बँकेची कोंडी होत असून, ताळमेळ बसवण्याचे आव्हान आहे.
बँकेचे ४७ टक्के कर्ज वसूल
नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरीत करण्याचे काम शाखा व सेवा सोसायटी स्तरावर सुरू आहे. बँकेने मार्चअखेर ३ लाख २२ हजार शेतकऱ्यांना २ हजार ५८२ कोटींचे खरीप पीककर्जासह ३९ हजार शेतकऱ्यांना ४७९ कोटींचे कर्ज वाटप केले. पैकी ४७.१८ टक्के कर्ज वसुल करण्यात आले. कर्जवसुलीतील व्याजाचा परतावा दिला जाणार आहे.