अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! सर्व प्रशासकीय कार्यालये …

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील प्रमुख व महत्वाची असणारी सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार असून ही प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या जागेची पाहणी केली आहे.

राहुरी व तांदुळवाडी गावाच्या मध्यावर रेल्वे स्टेशन रोडवरील राहुरी नवीन गावठाण हद्दीतील सुमारे ११ हेक्टर क्षेत्र राहुरी नगरपालिकेच्या नावे करण्यात येणार असून यामध्ये राहुरी ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती आदी सुसज्ज प्रशासकीय कार्यालये असलेली इमारत बांधली जाणार आहे.

विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून जनता व प्रशासनाच्या सोयीसाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे १५ वर्षांनंतर प्रशासकीय मान्यतेसाठी आराखडा व अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.’

त्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. सध्याच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसायला अथवा जनतेला उभे राहण्यासाठी देखील जागा पुरत नाही. जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी दर वर्षी लाखो रुपये खर्च होतात.

कोणत्याही क्षणी इमारतीचा एखादा भाग कोसळून दुर्घटना होऊ शकते. जीव मुठीत धरूनच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. आता विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी नियोजित जागेची पाहणी केली आहे.

यावेळी तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, तालुका कृषी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, भूमी अभिलेख अधिकारी ताठे, मंडलाधिकारी वैशाली सोनवणे, तलाठी रविंद्र बाचकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सध्या राहुरी तहसील कार्यालय परिसरात महसूल विभागाने कारवाई केलेली वाहने, अपघात झालेली वाहने, कामानिमित्त येणारे नागरिक यांची गर्दी होत असून व सर्वत्र असलेल्या वाहनांमुळे कधी कधी उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही.

त्यामुळे स्टेशन रोड परिसरात सर्व प्रशासकीय कार्यालये इमारत झाल्यानंतर नक्कीच अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office