श्रीरामपूर, वैजापूर तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गोदावरी नदीपात्रातील शनि देवगाव येथील उच्च स्तरीय बंधाऱ्यास मंत्री मंडळाने नुकतीच मंजुरी दिली असून यासाठी २८५ कोटी ६४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती वैजापूरचे आ. रमेश बोरणारे यांनी दिली.

या बंधाऱ्यामुळे वैजापूर व श्रीरामपूर तालुक्याला लाभ मिळणार आहे. सदरचे वृत्त समजताच गोदाकाठच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल अधिक माहिती देताना आ. बोरणारे यांनी सांगितले की, शनि देवगाव (ता. वैजापूर) येथे गोदावरी नदीवर होणाऱ्या दिड टि.एम.सी. क्षमतेच्या उच्च स्तरीय बंधाऱ्याचा वैजापूर व श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठाच्या गावांना लाभ होणार आहे. या बंधाऱ्यास मंजुरी मिळण्यासाठी आपण पाठपुरावा केला होता, अखेरीस यश आल्याचे आ. बोरणारे यांनी सांगितले.

दिड टि.एम.सी. साठवण क्षमतेच्या या उच्चस्तरीय बंधाऱ्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण, खानापूर, कमालपूर, महांकाळवाडगाव तसेच वैजापूर तालुक्यातील शनि देवगाव, चेंडूफळ, बाजाठाण, हमरापूर, अव्वलगाव, नागमठाण, चांदेगाव, डागपिंपळगाव आदी गावांना लाभ होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतीला संजीवनी मिळणार असून पाटपाण्यापासून वंचित गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

सदरचे काम मंजूर केल्याबद्दल आ. बोरणारे यांचे अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी कौतुक केले. तसेच संबंधित गावांच्या लाभधारक ग्रामस्थांनी आ. बोरणारे यांचा शनी देवगाव येथे सत्कार केला.