अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- सर्वांसाठी घरे ‘ योजने अंतर्गत महाआवास योजना – ग्रामीण ‘ अभियानामध्ये जिल्ह्यातील काम हे राज्यातील इतर जिल्ह्यासाठी पथदर्शक असावे, यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी काम करावे.
सरकारी आणि गायरान जमिनीवर असणारे अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करावी. शासन निर्णयाचे अवलोकन करून येत्या १५ दिवसात यासंदर्भातील काम पूर्ण करावे आणि तसे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी सोमवारी दिल्या.
‘सर्वांसाठी घरे’ योजने अंतर्गत महाआवास योजना – ग्रामीण ‘ अभियानाचा जिल्ह्यातील कामाचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उप जिल्हाधिकारी संदीप नीचित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) निखिल ओसवाल यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नगररचना, पाटबंधारे आदी विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. तालुका पातळीवरून प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यातील महा आवास योजनेतील घरकुल कामांना आता गती आवश्यक आहे. ज्या अडचणी असतील त्या तात्काळ सोडवून प्रलंबित कामे तालुका स्तरीय यंत्रणांनी मार्गी लावावेत. यापुर्वीच या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी यंत्रणांमध्ये सुसूत्रता आणण्यात आली आहे.
त्यामुळे समन्वयाने तात्काळ कामे पूर्ण करून तसे प्रस्ताव शिफारशीसह जिल्हा समितीकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्य शासनाने विविध घरकुल योजना एकत्रित करून महा आवास योजना – ग्रामीण राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या महत्वाकांक्षी योजनेची आपल्या जिल्ह्यात गतीने होणे आवश्यक आहे.
महाआवास योजनेत जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना आणि पारधी घरकुल योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना यांचा एकत्रित तालुकावार आढावा त्यांनी घेतला. अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
घरकुल योजना अंमलबजावणी साठी लागणारी वाळू उपलब्ध करून देण्या संदर्भात गटविकास अधिकारी यांनी तहसीलदार यांना प्रस्ताव देऊन वाळू उपलब्ध होईल हे पाहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. घरकुल मंजुरीनंतर पहिला हफ्ता वेळेवर दिला गेला पाहिजे. जागेअभावी घरकुलाचे काम रखडणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी केल्या.