अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- महापालिकेने पुन्हा एकदा शास्तीच्या रकमेवरील सवलत योजनेला मुदतवाढ दिली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली असून, याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी नुकतेच आयुक्तांना पत्र दिले होते.
त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबरमध्ये लोकअदालत घेण्यात आली होती. यावेळी कोट्यवधी रूपयांचा कर वसूल झाला. त्यावेळी शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात आली होती.
ही सवलत सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आ. जगताप यांनी महापालिकेला पत्र देऊन शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत सूचविले होते. त्यानुसार आयुक्त शंकर गोरे यांनी ऑक्टोबरमध्ये सवलत योजनेस मुदतवाढ दिली होती.
त्याची मुदत ३१ ऑक्टोबरला संपली. नोव्हेंबरमध्ये शास्तीच्या रकमेतील सवलत आस्तित्त्वात नव्हती. त्यामुळे नागरिकांनी ही सवलत मिळावी, अशी मागणी आ.जगताप यांच्याकडे केली होती.
त्यानुसार आ. जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेला पत्र देऊन शास्तीच्या रकमेत सवलत देण्याबाबत सूचविले होते. ही सवलत देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत.
आ.जगताप यांचे पत्र मिळाल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भातील निर्णय गुरूवारी जाहीर केला. त्यानुसार १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ही सवलत योजना राहणार आहे. यामध्ये थकित करावर आकारण्यात आलेल्या शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे.