Ahmednagar News : कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, शेतकऱ्यांची पाण्याची गरज आणि अडचण लक्षात घेता. या आवर्तनाची वाढविण्याबाबत काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन विनंती केली होती.
दि. २ सप्टेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली ज्यामध्ये आमदार पवार यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, येत्या १० सप्टेंबरपर्यंत आता शेतकऱ्यांसाठी आवर्तन सुरू राहणार आहे.
कर्जतमधील एकूण ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून आहेत. मागील हंगामातील आवर्तन संपून दोन महीने झाले आहेत, आणि पावसाळा सुरू होऊन देखील म्हणावा तसा चांगला पाऊस झाला नसल्याने पाण्याची पातळी देखील खालावल्याची परिस्थिती आहे.
अशातच शेतीसह पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकरी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक आमदार रोहित पवार यांनी घेतली होती.
तसेच याबाबत त्यांनी मंत्री चंद्रकात पाटील यांना देखील मुंबईत भेटून विनंती केली होती. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, शेतकऱ्यांना आता त्यांच्या हक्काचे कुकडीचे आवर्तन दि. १० सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे.
त्यामुळे कोणतेही गावं अथवा शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. तसेच घोडचे आवर्तनही उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने, शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची अडचण लक्षात घेऊन कुकडीच्या आवर्तनाची तारीख वाढवावी अशी विनंती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेटून केली होती.