Ahmednagar News : तालुक्यातील जागृत देवस्थान बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यंदा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकेल, असा कौल दिला आहे.
श्रीराम रतन पंचायतन भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट, चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या उपस्थित काल मंगळवारी (दि.९) गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली.
यापूर्वी बाल भैरवनाथाने दिलेला कौल खरा ठरला आहे. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून पुरोहित व ग्रामस्थ यांच्या मदतीने अठरा नक्षत्र रुपी गाडग्याच्या आकाराचे खड्डे घेतले जातात.
या एकसारख्या खड्ड्यामध्ये वडाचे पाणे ठेवून या पानांमध्ये सप्तधान्य व पाणी साठवले जाते. रात्रभर ही नक्षत्र रुपी खड्डे झाकून ठेवली जातात.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरीची पुरोहित यांच्या हस्ते पूजा केली जाते व नंतर पर्जन्यमान व वर्षाच्या कार्यकाळ कसा जातो हे सांगण्यात येते.
नक्षत्ररूपी खड्ड्यामध्ये वडाच्या पानांमध्ये जर जास्त पाणी शिल्लक राहिले, तर त्या नक्षत्रात चांगला पाऊस, ज्या नक्षत्ररुपी खड्ड्यात मध्यम पाणी शिल्लक राहील त्या नक्षत्रात मध्यम पाऊस, तर ज्या नक्षत्र रुपी खड्ड्यात पाणीच शिल्लक राहणार नाही ते नक्षत्र कोरडे जाणार असल्याचे सांगितले जाते. नक्षत्र रुपी खड्ड्यांची पूजा झाल्यानंतर अठरा नक्षत्रा मधील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
पर्जन्यमान वर्तवल्यानंतर पुरोहित विनोद जोशी यांनी चालू वर्ष कसे जाणार असल्याचे पंचांग वाचन करून सांगितले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत चांदेकसारे यात्रेचे नियोजन करण्यात आले. तेलवण मंगळवार (दि.१६) एप्रिल रोजी पडणार आहे. देवाला हळद (दि. १६) एप्रिल ला लावण्यात येईल.
(दि.१७) एप्रिल ते (दि. २१) एप्रिल या कालावधीत तेलवण अर्थात उपवास करण्यात येणार आहे. (दि.१७) एप्रिल रोजी रामनवमी उत्सव, तर बाल भैरवनाथ व जोगेश्वरीचा रथ उत्सव (दि.२१) एप्रिल रोजी असणार आहे. जत्रा व कुस्त्यांचा हंगामा (दि.२२) एप्रिल रोजी होईल. हनुमान जयंती (दि.२३) एप्रिलला असून भैरवनाथ यात्रा उत्सव १५ दिवस चालणार आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना बाल भैरवनाथ महाराजांचे दर्शन होण्यासाठी श्रीराम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट विशेष सुविधा उपलब्ध करून देणार आहे. बाल भैरवनाथ यात्रा उत्सव व दर्शनाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भैरवनाथ ट्रस्ट चांदेकसारे, यात्रा उत्सव कमिटी व चांदेकसारे ग्रामस्थांनी केले आहे.