राज्यात रेशन धारकांसाठी विविध योजना, स्वस्त धान्य आदी योजना शासन राबवत असते. पिवळे व केसरी कुपन असणाऱ्यांसाठी विशेषतः या योजना असतात. आता श्वेत अर्थात पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्डधारकांनाही महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
श्वेत शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हापुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यामध्ये २०२३ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार, आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही देण्यात येणार आहे. शुभ्र शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे.
शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आरोग्याची सुविधा असावी अशी मागणी अनेकांनी केली होती. त्यामुळे आता या सर्वांची मागणी पूर्ण होणार असून या लाभधारकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील.