अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे. नरेगा अंतर्गत गायींचे गोठा अनुदान योजनेत पंचायत समिती पदाधिकार्याने जवळच्या लोकांना या योजनेचा लाभ दिला असून गायगोठा न बांधताच अनुदान वाटले असल्याची तक्रार प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप काळे यांनी केली आहे.
याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काळेंनी तहसीलदारांकडेे केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत काळेंनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सन 2019-20 मध्ये नरेगा अंतर्गत ग्रामपंचायत माहेगाव देशमुख ग्रामसेवक व सरपंच आणि इतर सदस्यांनी गावातील नागरिकांचे गायगोठ्याचे प्रस्ताव पाठविले होते.
सदर प्रस्ताव गटविकास अधिकारी कोपरगाव यांनी मंजूरही केले. सदर प्रस्तावात आदिवासी, दलीत, अल्पभूधारकांचे नावाचा विचार न करता पंचायत समिती पदाधिकार्याच्या जवळच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले.
प्रस्ताव मंजूर तर झाले मात्र प्रत्यक्षात गोठे बांधले नाही. खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे पंचनामे दिल्यावरून अधिकार्यांनी संबंधितांच्या खात्यावर रकमाही जमा केल्या.
माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी पदाचा दुरुपयोग केला. याप्रकरणी अधिकार्यांची चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी.
असे न झाल्यास दि. 01 नोव्हेंबर 2021 रोजी तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.