अहमदनगर बातम्या

Shrigonda Elections : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ! श्रीगोंदा तालुक्यात असे आहे आरक्षण

Published by
Ahmednagarlive24 Office

Shrigonda Elections : श्रीगोंदा तालुक्यातील मागील काही महिन्यांपासून प्रशासकीय कारभार सुरू असलेल्या दहा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या ग्रामपंचायतींची निवडणूक दि. ५ नोव्हेंबर रोजी होणार असून,

६ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. पुढील महिन्यात होणारी ग्रामपंचायत निवडणूक काही नेत्यांच्या अस्तित्वाची असणार आहे.

तालुक्यातील देवदैठण, लोणी व्यंकनाथ, कोळगाव, मढेवडगाव, आनंदवाडी, पेडगाव, अधोरेवाडी, टाकळी लोणार, विसापूर, घुटेवाडी, या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्याने मागील काही महिन्यांपासून प्रशासक नियुक्त करण्यात आले होते.

दहा ग्रामपंचायत निवडणुकीची ६ ऑक्टोबर रोजी नोटीस प्रसिद्ध होणार असून, १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देश पत्र सादर करणे, दि. २३ ऑक्टोबर रोजी छाननी, २५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देश पत्र ३ वाजेपर्यंत माघार घेण्याचा अंतिम दिवस,

२५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप, निवडणुक ५ नोव्हेंबर रोजी तर निकाल ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

सन २०२० -२१ मध्ये निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी जाहीर केलेल्या आरक्षणानुसार लोणी व्यंकनाथ – सर्वसाधारण स्त्री, देवदैठण – सर्वसाधारण स्त्री, आनंदवाडी – सर्वसाधारण स्त्री, कोळगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती,

मढेवडगाव- सर्वसाधारण व्यक्ती, टाकळी लोणार- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, अधोरेवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, पेडगाव – सर्वसाधारण व्यक्ती, विसापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, घुटेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, – असे आरक्षण जाहीर करण्यात आले होते.

कोळगाव, लोणी व्यंकनाथ, देवदैठण, मढेवडगाव, विसापूर सारख्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांत नेत्यांचा आणि उमेदवारांचा मतदारांची मनधरणी करताना कस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक जनतेमधून होणार असल्याने निवडणुक चुरशीची होणार असून, मागील काही दिवसांपासून गरम असलेले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Ahmednagarlive24 Office