Ahmednagar News : एरवी सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलासह विविध माध्यमातून वीज वितरण कंपनी चांगलाच शॉक देत असते. तसेच अनेकदा वीज वितरण कंपनीच्या सावळया कारभाराचा सर्वसामान्यांना फटका बसत असतो.
मात्र आता या वीज वितरण कंपनीलाच ग्रामपंचायतने शॉक दिला आहे. वीज वितरण कंपनीकडे ग्रामपंचायतची असलेली दीड कोटीची थकबाकी भरा अन्यथा तुमची मालमत्ता जप्त करू, अशी नोटिस या ग्रामपंचायतने वीज वितरण कंपनीस दिली आहे.
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे गावाच्या हद्दीत असलेले विजेचे खांब, रोहित्र याचा कर आकारला आहे. त्याची थकबाकी १ कोटी ४३ लाख ५० हजार रुपये आहे.
थकबाकीची नोटीस कंपनीस बजावली असून, थकबाकी न भरल्यास कंपनीची मालमत्ता जप्त करणार असल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले. तशी नोटिस देखील वीज वितरण कंपनीस बजावली आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगावच्या धर्तीवर सौंदाळा ग्रामपंचायतीने वीज वितरणाचे खांब, रोहित्राला कर आकारणी केलेली आहे. २०२१ पासून ग्रामपंचायतीने सातत्याने नोटीसद्वारे ही कर मागणी केलेली आहे.
त्याबाबत कार्यकारी अभियंता ग्रामीण यांनी त्यांच्याच विभागास अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना मूल्यांकन करण्यासाठी पत्र दिले आहे; परंतु अद्याप पुढे कुठलीही कारवाई झाली नसल्याने ग्रामपंचायतीने पुन्हा नोटीस बजावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट २०२१ मध्ये ग्रामपंचायतीला वीज वितरणाचे खांब, रोहित्र मालमत्तेवर कर आकारणी करण्यासाठी माणगाव (जि. रायगड) या ग्रामपंचायतीस परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सौंदाळा ग्रामपंचायतीनेदेखील कर मागणी केलेली आहे.
सदर थकबाकी तातडीने न भरल्यास जप्तीची कारवाई करणार असल्याची नोटीस बजावलेली आहे. सौंदाळा ग्रामपंचायत हद्दीतील २२० केव्ही सबस्टेशनला ग्रामपंचायतीने दर वर्षाला १८ लाख ७२ हजार ८७१ रुपये कर आकारून वसूलही केलेले आहे. त्याच पद्धतीने विद्युत वितरण कंपनीकडून वसूल करणार असल्याचे सरपंच आरगडे यांनी सांगितले.