Ahmednagar News : बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ ते ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी २७ डिसेंबर २०२० रोजी केली होती. परंतु यातील एक रुपयाही या ग्रामपंचायतींना मिळाला नाही.
जिल्ह्यात १३२० ग्रामपंचायती आहेत. मुदत संपली की वेगवेगळ्या कालावधीत या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतात. अनेकदा राजकारणाच्या ईर्षेतून गावात गटबाजी वाढते. नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचाही गावच्या विकासावर परिणाम होतो.
त्यामुळे निवडणुका बिनविरोध करा आणि २५ ते ५० लाखांचा निधी मिळवा, अशी घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी २७ डिसेंबर २०२० रोजी केली होती. त्याआधी आर. आर. पाटील ग्रामविकासमंत्री असतानाही अशीच घोषणा केली होती. परंतु यातील एक दमडीही आतापर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींकडून नाराजी व्यक्त केली जाते.
११ ग्रामपंचायती बिनविरोध
१८ डिसेंबर २०२२ मध्ये जिल्ह्यात २०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या, त्यापैकी ११ बिनविरोध झाल्याने १९२ ठिकाणी मतदान झाले. याशिवाय १५ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि १३ ग्रामपंचायतीचे सदस्य बिनविरोध निवडले गेले.
आता मात्र ग्रामपंचायतींची कोटींची उड्डाणे
बिनविरोध ग्रामपंचायती केल्यास ठरावीक रक्कम देण्याची घोषणा हवेत विरली, मात्र दुसरीकडे अनेक ग्रामपंचायती अशा आहेत, ज्या निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकांत सर्वाधिक तंटे होण्याचे प्रमाण अधिक असते. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सर्वाधिक मनुष्यबळ लागते. पर्यायी यातून शासनाचा खर्चही अधिक होतो.