आजोबांनी पण तेच केले, आता हे पण तेच करत आहेत; विखे कुटुंबाची खासियतच अशी आहे की, त्यांना … ?: खासदार निलेश लंके यांची टीका

Published by
Ahmednagarlive24 Office

विखे पाटील फाउंडेशनची तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी माफ केल्याचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवा 

Ahmednagar News : पाच वर्षांसाठी मी मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून आलो आहे. या मतदारसंघात विविध योजना आणून विकास करण्याचे काम माझ्याकडे आहे. तर आता त्यांच्याकडे काहीच काम नाही. त्यामुळे कोर्टकचेऱ्या हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे दिले आहे. देशात इतके खासदार निवडून आले, मात्र कुणीही चौकशी लावली नाही. विखे कुटुंबाची खासियतच अशी आहे की, त्यांना पराभव मान्यच नाही. त्यांच्या आजोबांनी पण तेच केले, आता हे पण तेच करत आहेत, अशा शब्दांत लंके यांनी विखेंवर टीका केली.

खासदार लंके यांनी शनिवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. याबाबत खा. लंके यांना पत्रकारांनी विचारले असता त्यावर त्यांनी टिपण्णी केली.

या बैठकीला मनपाचे आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्यासह उपायुक्त, विभागप्रमुख, माजी नगरसेवक व विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी मनपाने विखे पाटील फाउंडेशनला अनधिकृतरीत्या तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी माफ केल्याबाबत तक्रार केली. त्यावर अशा पद्धतीने कुणालाही पैसे माफ करता येत नाहीत, कुणाच्या अधिकारात हे पैसे माफ केले, ही चुकीची पद्धत आहे, अशी टिप्पणी करत हा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवा, अशा सूचना खासदार नीलेश लंके यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

याबाबत लंके यांनी आयुक्त डांगे यांनी विळद घाटात १९८० सालापासून महाविद्यालये आहेत. त्यामुळे तेथे पूर्वीपासून महापालिकेचे नळ कनेक्शन आहे. तसेच हा विषय नेमका काय आहे, हे मी तपासून पाहतो, असे सांगितले.

यावर लंके म्हणाले, आढावा बैठकीत खासदारांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही शासनाकडे हा ठराव विखंडित करण्यासाठी पाठवत आहोत, असे स्पष्ट करा. पुढे या विषयाचे काय करायचे ते आम्ही पाहू, अशी सूचना आयुक्तांना केली.

कोट्यवधी रुपये खर्च होऊन गेल्या १३ ते १४ वर्षांपासून केंद्र शासनाची फेज टू योजना रखडल्याने नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार उपस्थितांनी केली. यावर लंके यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला.

तसेच याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, मनपाचे अधिकारी आणि योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारासमवेत शहरात योजनेची पाहणी केली जाईल. योजना कार्यान्वित होण्याबाबत कुठे अडचणी आहेत, यावर चर्चा करून त्या सोडविल्या जातील, असे सांगितले.

दरम्यान, या बैठकीत माजी नगरसेवक व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात मोकाट कुत्रे, घनकचरा, बंद पथदिवे, विस्कळीत पाणीपुरवठा, बांधकाम परवाने, जन्म-मृत्यूचे दाखले काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी आदींबाबत तक्रारी केल्या. यावर लंके यांनी व्यवस्थित काम करा, नागरिकांच्या समस्या मार्गी लावा, कुणीही चुकीचे काम सांगितले तर करू नका, कुणाच्या दबावाला बळी पडू नका, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

Ahmednagarlive24 Office