अहमदनगर बातम्या

चार जणांची एकत्र अंत्ययात्रा : आजी, आजोबा व नात एकाच सरणावर,आक्रोश व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अकोले शहरातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध चवदार भेळ व्यवसाय करणारे अभय सुरेश विसाळ व छोटासा व्यवसाय प्रामाणिकपणे करणारे सुनील धारणकर, आशा सुनील धारणकर व अडीच वर्षांची चिमुकली ओजस्वी यांचे दि. १७ रोजी नाशिक- पुणे महामार्गावर ओव्हरटेक करताना चंदनापुरीजवळ अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात व तालुक्यात शोककळा पसरली होती.

चौघांवरही शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत होते. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवून चौघांना श्रद्धांजली वाहिली. चारही मृतदेहांवर शवविच्छेदन झाल्यावर अकोले येथील स्मशानभूमीत अतिशय दुःखद अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अंत्यविधीसाठी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, महिला व विशेष करून तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. चितेला अग्नी डाग देताच उपस्थित मित्र, नातेवाईक यांच्या भावनांचा बांध फुटला.

आजी, आजोबा यांच्यामध्ये नातीचा मृतदेह एकाच सरणावर ठेवण्यात आला होता. तर अभय विसाळ यांचा त्यांच्या शेजारील सरणावर मृतदेह ठेवण्यात आला होता. या प्रसंगाने यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.

अकोले शहरात एकाच वेळी चार व्यक्तींवर अंत्यविधी होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. यावेळी अग्नी दिल्यानंतर मोरेश्वर धर्माधिकारी गुरु यांनी गितेच्या १५ अध्यायाचे पठण केले.

मात्र यावेळी कोणालाही शब्द व्यक्त करणे शक्य न झाल्याने श्रद्धांजली घेण्याचे टाळले. शेवटी पसायदान होऊन सर्व उपस्थित नागरिकांनी साश्रू नयनाने या चौघाना भावपुर्ण श्रद्धांजली वाहून निरोप दिला.

धारणकर कुटुंबीय पुणे येथे आपल्या गाडीने गेले असताना त्यांची भेट अभय विसाळ यांच्याशी झाली. ते बसने येणार होते, मात्र आमच्या गाडीत जागा आहे, सोबत जाऊ असे म्हणत विसाळ व त्यांची पत्नीही त्यांच्या सोबत आल्या. मात्र अकोलेकडे येत असताना त्यांचा अपघात झाला.

हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याचे अनैतिक संबंध, जावयाने केला निर्घृण खून ! आधी गळा कापला नंतर जाळून टाकले

Ahmednagarlive24 Office