अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-सावेडी येथील वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब येथे विद्यार्थ्यांसाठी स्केटिंग प्रशिक्षणाचे शुभारंभ विजूभाऊ परदेशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी राजीव गुप्ता, भाऊसाहेब निमसे, गौरव डहाळे, कृष्णा अल्हाट, श्रीकांत कसाब, क्रीडाशिक्षक साईनाथ कोल्हे, महेश बांगल, चंद्रकांत निकम, विक्रांत नवले आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळात क्रीडा मैदाने व विविध खेळाचे प्रशिक्षण बंद होते. सध्या क्रीडा मैदाने सुरु झाल्याने स्केटिंगचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्रशिक्षक प्रशांत पाटोळे यांनी दिली.
यावेळी स्केटिंग खेळाडू रुद्र निकम, जागृती बागल, आदर्श बिश्वास, कलश शहा, वरनिका नवले, छबी चौधरी आदी खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शहरातील सावेडी भागात अनेक उत्कृष्ट स्केटिंग खेळाडू असून, खेळाडूंना सराव करण्यासाठी उत्तम प्रकारचे स्केटिंग मैदान उपलब्ध नसल्या कारणाने खेळाडूंची मोठी गैरसोय होत होती.
वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबचे सतीश वाकळे यांनी खेळाडूंसाठी अद्यावत ट्रॅक असलेले मैदान उपलब्ध करून दिले आहे. स्केटिंग क्षेत्रातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याकरिता वाकळे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंग बनवण्याचा संकल्प सतीश वाकळे व संदीप वाकळे यांनी व्यक्त केला.
या स्पोर्टस क्लब मधील स्केटिंगच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबमध्ये स्केटिंगसह बॅडमिंटन,
जिम, टेबलटेनिस, फुटबॉल, झुंबा इत्यादी प्रकारचे खेळ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. स्केटिंगच्या अधिक माहितीसाठी 8087870899 प्रशांत पाटोळे यांच्याशी संपर्क साधावा.