अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील आर्थिक विकासात नेहमीच पुढे असणाऱ्या महसूलमंत्र्यांचा संगमनेर तालुका सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. संगमनेरात सध्या कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरात गावगुंडांकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे, मात्र पोलिसांकडून यांच्यावर काही एक कारवाई केली जात नसल्याने नागरिकानंदमह्ये दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वेळा तडीपार असणार्या एका गावगुंडाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शहरात या गुंडाची दहशत पसरली आहे.
पोलिसांनाही न जुमानणारा हा गुंड मारहाणी सोबतच लुटही करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. या गुंडाने गुरुवारी रात्री एका युवकास मारहाण केली.
हा युवक पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द तक्रार करण्यासाठी गेला असता पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्याला बराच वेळ पोलीस ठाण्यात बसून ठेवले.
त्यानंतर थातूरमातूर तक्रार दाखल करून आम्ही बघून घेतो असे म्हणत त्या युवकाला घरी काढून दिले. या गावगुंडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर गुंडावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी असलेल्या खाकीकडूनच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचे चित्र सध्या संगमनेरात दिसून येत आहे.