अहमदनगर बातम्या

पटसंख्येच्या टार्गेटसाठी गुरुजी दारोदारी, संचमान्यतेच्या नव्या निकषाचा घेतलाय धसका

Published by
Ahmednagarlive24 Office

सर्वत्र शाळा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जूनमध्ये शाळा सुरु होतील. जिल्ह्यामधील काही शाळांचे शिक्षक मात्र शाळेत विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तळपत्या उन्हात घरोघरी भटकंती करीत असल्याचे चित्र काही तालुक्यात दिसत आहे.

दरम्यान, विद्यार्थी वर्गाला मिळाला नाही तर पटसंख्येअभावी झेडपी शाळाचा वर्ग बंद पडेल, तर खासगी शाळेच्या संस्था चालकाने दिलेले टार्गेट पूर्ण झाले नाही तर नोकरी जाईल, या भीतीपोटी शिक्षक हे पालकांच्या दारोदारी जाताना दिसत आहे.

सद्यःस्थितीत खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि शासकीय शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वयंअर्थसहाय्यित आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासह, विद्यार्थी संख्या टिकविण्याची आता स्पर्धा सुरू झाली आहे. त्यासाठी संस्थेकडून शिक्षकांना विद्यार्थी वाढीचे उद्दिष्टही देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खासगी शाळांचे शिक्षक गट करून विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवित आहेत.

विद्यार्थ्यांची गणपूर्ती करण्यासाठी अनेक शिक्षक तर स्वः खर्चातून विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रलोभन देत आहेत. शहरासह तालुक्यात शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. येत्या १५ जूनपासून शाळा-प्रवेशोत्सव सुरू होणार असताना शाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यासाठी शिक्षकांची जणू चढाओढच लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील काही वर्षांपासून शासकीय, अनुदानित व मराठी शाळांची विद्यार्थी संख्या दरवर्षी कमी होत आहे. यातून शिक्षकांची संख्याच नव्हे, तर शाळांची संख्याही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात शिक्षकांची पदे आणि पर्यायाने शाळाही टिकविण्यासाठी पटसंख्या वाढविणे आवश्यक आहे. हेच मुख्य आव्हान शासकीय, अनुदानित आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांपुढे असल्याचे सध्याच्या स्थितीवरून दिसते.

संचमान्यतेच्या नव्या निकषाचा धसका !
शालेय शिक्षण विभागाने २०२४-२५ साठी नवीन संच मान्यता निकष जाहीर केले आहेत. यापूर्वी १ ते ४ पर्यंतच्या शाळांना दोन शिक्षक मंजूर होते. मात्र नवीन निकषानुसार २१ पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये चार वर्गापर्यंत एकच शिक्षक राहणार आहे.

यामुळे दुर्गम भागातील, वाड्या वस्तीवरील शाळांसह इतरही शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती आहे. याचा धसका शिक्षकांनी घेतल्याचे दिसत आहे.

Ahmednagarlive24 Office