अर्धा डझन बिबट्यांनी दोन शेळ्या केल्या फस्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे.

बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर एक दोन नव्हे तर चक्क सहा बिबट्यांनी मिळून बंदीस्त गोठ्यात हल्ला करुन दोन शेळ्या मारल्या तर आरडाओरडा करणार्‍या महिलेवर ही हल्ला केला.

परंतु ही महिला थोडक्यात बचावल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील दाढ खुर्द शिवारात नानाभाऊ वाघमारे यांची वस्ती व बंदीस्त जनावरांचा गोठा आहे. रात्रीच्या सुमारास वाघमारे वस्तीवर सहा बिबटे शिकारीच्या शोधात दाखल झाले होते.

त्यामुळे शेळ्यांनी मोठ्याने ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे नेमके काय झाले हे पाहण्यासाठी वाघमारे कुटुंब बाहेर आले असता दोन बिबटे गेट समोर, दोन बिबटे मागील बाजूला तर दोन बिबटे थेट आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन बंदीस्त गोठ्यात शिरलेले दिसले. यावेळी बिबट्यांनी दोन शेळ्या ठार करत एक शेळी उचलून गोठ्याबाहेर नेली.

यावेळी बिबट्यांना हुसकवण्यासाठी वाघमारे कुटुंब सरसावले असता बिबट्याने बबई वाघमारे या महिलेवर हल्ला केला. पण दैव बलवत्तर म्हणून महिलेची पंजा लागल्याने केवळ साडी फाटली. महिला थोडक्यात बचावली. त्यामुळे वाघमारे कुटुंबियात मोठी दहशत निर्माण झाल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

वाघमारे यांनी स्थानिक नागरिकांसह संगमनेर वनविभागाला माहिती देण्यासाठी फोन केला असता वनविभागाच्या अधिकार्‍यानी फोन उचलला नाही. त्यामुळे वाघमारे यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांना फोन करुन घडलेल्या गंभीर घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभिर्य ओळखत वनमंत्र्यांनी थेट प्रशासकीय यंत्रणा हलवल्याने बिबट्यांना पकडण्यासाठी पिजंर्‍यासह अधिकार्‍यांचा फौज फाटा रात्री 2.30 वाजेच्या सुमारास वाघमारे यांच्या वस्तीवर दाखल झाला. दरम्यान कळपात हल्ला करणारे हे सहा बिबटे जेरबंद करावे अशी मागणी दाढ खुर्द ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24