हंडा मोर्चा ! पिण्याच्या पाण्यासाठी महिला झाल्या आक्रमक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-भिंगार शहरात छावणी परिषद हद्दीत अकरा दिवसापासून पाणी न सुटल्याने नागरिकांनी छावणी परिषदेवर मोर्चा काढला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात रिकामे हांडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आंदोलकांनी सर्व नगरसेवक व छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिकात्मक दगड ठेऊन त्याची पूजा केली व लवकरात लवकर पिण्यासाठी दररोज पाणी मिळण्यासाठी साकडे घालण्यात आले.

भिंगार येथील छावणी हद्दीत सुमारे अकरा दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरत आहेत.

मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचे हाल होत असून, सदर ठिकाणी पाण्याचे टँकर येत असले तरी हे टँकरमधून मोजक्या लोकांनाच पाणी वाटप केले जात आहे.

काही ठिकाणी बोअरवेल नादुरुस्त असल्याने, कॅन्टोन्मेंटचे पाणी नाहीच तर बोअरवेलचे पाणी मिळणे देखील अवघड झाले आहे.

स्थानिक नागरिकांसह महिलांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहे. छावणी परिषदेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता उडवाउडवीचे उत्तरे दिले जात आहे.

भिंगार शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न येत्या 6 दिवसात न सोडविल्यास मंगळवार दि.22 डिसेंबरला तीव्र आंदोलन करुन भिंगार बंद ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24