Pathardi News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अवैधंद्यांसह वृद्धेश्वर विद्यालय परिसरातील अतिक्रमणांबाबत खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
तिसगाव येथे मागील एक दीड महिन्यात बाहेरगावच्या तसेच तिसगावमधील विद्यार्थिनींची भररस्त्यावर छेड काढण्याचे प्रकार झाले. तसेच बाहेरगावच्या नागरिकांनादेखील तिसगावमध्ये काही टवाळखोर तरुण दमबाजी करतात, याबाबत बाहेरगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी माजीमंत्री कर्डिले यांची भेट घेऊन या घडलेल्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत लक्ष घालण्याची विनंती केली.
कर्डिले यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांसह पोलिस अधिकारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या वेळी टवाळखोर तरुणांसह विद्यालय परिसरात शासकीय जागेत असलेल्या अतिक्रमणांचा मुद्दा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
तसेच तिसगावमध्ये अवैध धंद्यातून कमावलेली संपत्ती आणि पैसा, यातून तरुणांची माथी भडकावण्याचे होत असल्याचे कर्डिले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच पालक व काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर कर्डिले यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून,
या गोष्टी कायमस्वरुपी बंद करण्यासाठी खा. सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर विभागांच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक आयोजित करून या सर्व गोष्टींना आळा घालण्याचे काम केले जाईल.
तिसगावमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना तिसगावमधील काही लोकांकडून त्रास दिला जातो. असले प्रकार पुन्हा घडू नयेत, बाहेरगावच्या लोकांना, बाजारपेठेत त्रास झाल्यास त्याचा बाजारपेठेवर परिणाम होईल तसेच व्यापाऱ्यांनादेखील कोणी त्रास देऊ नये अन्यथा ते देखील इतर मार्ग स्वीकारतील.