अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करून महिलेसोबत गैरवर्तन करणार्या आरोपीला न्यायालयाने दोषी धरून एक वर्ष कारावास व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
किशोर अरूण विधाते (रा. श्रीकृष्णनगर, कल्याणरोड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश व्ही. सी. देशपांडे यांनी हा निकाल दिला.
या खटल्यातील महिलेच्या घरामध्ये विधाते याने कोंबडा विकत घेण्याच्या बहाण्याने प्रवेश केला होता. तू मला खूप आवडते, असे म्हणत विधाते याने महिलेचा हात धरून त्यांच्याशी गैरवर्तन केले होते.
याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विधातेविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचा खटला न्यायाधीश देशपांडे यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षाच्यावतीने वकिल यादव यांनी काम पाहिले. त्यांना सहायक फौजदार राजेंद्र माळी यांनी मदत केली.