अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जामखेडमधील दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीने ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. विजय उर्फ काकासाहेब बबन गर्जे असे त्या उमेदवाराचे नाव आहे.
२०१८ मध्ये जामखेडमध्ये झालेल्या राळेभात बंधूंच्या खून प्रकरणात गर्जे सध्या तुरुंगात आहे. जामखेड तालुक्यातील नाहुली ग्रामपंचायतीत गर्जे विजयी झाला आहे.
जामखेड शहरात एप्रिल २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांचा खून झाला होता. ते दोघे एका हॉटेलमध्ये बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींना गोळीबार करून त्यांचा खून केला होता.
यामध्ये काही आरोपींना अटक झाली होती. मात्र, या गुन्ह्यात नाव आलेला गर्जे बराच काळ फरार होता. गर्जे जामखेड बाजार समितीचा संचालक होता. राजकीय वैरातून राळेभात यांचा खून झाल्याचे तपासात उघड झाले होते.
पोलिसांनी शोध घेऊनही गर्जे सापडच नव्हता. त्याचा अटकपूर्व जामीन फेटळाण्यात आला होता. अखेर मे २०२० मध्ये गर्जे उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगावमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. तत्कालीन उपअधीक्षत संजय सातव यांच्या पथकाने दुचाकीवरून पळून जाणाऱ्या आरोपीला सुमारे चाळीस किलोमीटर पाठलाग करून पकडले होते.
तेव्हापासून तो तरुंगात आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्याने गावातून निवडणूक लढविली. त्यासाठी त्याने दोन दिवसांची रजा घेतली होती. त्या काळात त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्याला परत तुरुंगात जावे लागले. त्याच्या कार्यकर्त्यांनीच प्रचारची धुरा सांभाळली. अखेर तो ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाला आहे. दुहेरी हत्याकाडांची घटना घडली तेव्हा जामखेडसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते. या गुन्ह्यात कैलास माने, उल्हास माने, प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन जाधव, बापू काळे आदी आरोपींना सुरवातीलाच अटक करण्यात आली होती.
मात्र, यामध्ये राजकीय संबंध असलेला गर्जे फरार असल्याने त्याची खूप चर्चा झाली होती. अखेर पोलिसांनी त्यालाही जेरबंद केले. आता त्यानेच तुरुंगातून निवडणूक लढवत विजय मिळविला आहे