अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे.
त्यामुळे शेतकर्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच नेवासे तालुक्यातील माका तसेच पाचुंदे म.ल.हिवरे,आडगाव तसेच इतर परिसर शेजारच्या गावात बिबट्याच्या वावरामुळे घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याअगोदर बिबट्या, वाघ रानातीलच रानडुकरे, मोर, कुत्रे, या प्राण्यांवरती उपजीविका भागवत असे, पण आता ही संपल्यानंतर अलीकडे याने आपला मोर्चा शेतातील वस्तींकडे वळविला आहे.
आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने अतिष आबासाहेब क्षेत्रे यांच्या राहत्या वस्तीवरील दोन शेळ्यांचा फाडशा पाडला.तर पाचुंदे शिवारात शेतात बसुन मेंढरे चारण्यासाठी असलेल्या मेंढपाळाच्या घोड्याचे पिल्लु बिबट्याने खाल्ले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबतीत माहिती मिळताच क्षेत्रे यांच्या वस्तीवरती वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. पहाणी करून पंचनामा केल्याची माहिती वनविभागाचे सयाजी मोरे यांनी दिली.