अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अनेक भागात अद्यापही बिबट्याची दहशत कायम असून, शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना आपला जीव मुठीत ठेवूनच काम करावे लागत आहे.
अनेक भागात बिबट्याने अधूनमधून हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत.नुकताच असाच थरार पारनेर तालुक्यात घडला.
येथील एका शेतकऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तोंडातून शेळीचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथील शेतकरी सयाजी वाळुंज हे नेहमीप्रमाणे शेळया चारण्यासाठी रानात गेले होते.
पिंपळगाव तुर्क शिवारलगत एकटेच पठारावर शेळ्या चारत असताना अचानक बिबट्याने त्यांच्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला व एक शेळी ओढून चालवली असताना त्यांनी धाडस करून बिबट्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली.
यात शेळी जखमी झाली आहे. परंतु या प्रकाराने काकणेवाडी गाव व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सध्या शेतामध्ये पाणी भरणीचे दिवस आहेत पण बिबट्याच्या दहशतीने शेतकरी दिवसा शेतात जाण्यास घाबरत आहेत.
त्या बिबट्याबरोबर एक त्याचा बछडा सुद्धा आहे. काकणेवाडी येथील सरपंच व ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.