अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे योगेश्वर शेतकरी संघाचे संस्थापक समाजसेवक विलास वाघमारे यांनी अण्णा हजारेंना पाठींबा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .
दोन वर्षापूर्वी पद्मभूषण अण्णा हजारे यांनी रामलिला मैदानावर आमरण उपोषण केले होते . उपोषणाच्या सातव्या दिवशी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करू असे लेखी आश्वासन दिले होते .
परंतू अद्याप त्याची कार्यवाही सरकार करू शकले नाही . त्यामूळे आण्णा हजारे ३० जानेवारी पासून केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी हितासाठी उपोषण करणार आहेत .
सरकारने आण्णांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी , त्यांना या वयात उपोषणाची वेळ येऊ नये , देशासाठी महत्वाचे व्यक्ती आण्णा आहेत म्हणून आण्णांच्या उपोषणापूर्वी केंद्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विलास वाघमारे उपोषणास बसले आहेत .
यापूर्वी समाजसेवक विलासअण्णा वाघमारे यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी अनेक वेळा उपोषण केले असून आण्णांना पाठींब्यासाठी त्यांच्या उपोषणापूर्वी २००८व २००९ साली असे दोनदा उपोषणास बसले होते .
गावातील ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून समाजसेवक विलास वाघमारे यांना पाठींबा देत आहेत .