अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- व्ही.आर.डी.ई मुळे नगरचे नाव संपूर्ण जगात गेले आहे. ही संस्था नगरची शान आहे. हजारो नागरिकांची रोजीरोटी या संस्थेवर अवलंबून आहे. अशी महत्वपूर्ण संस्था नगर मधून स्थलांतरित होणे हे आपले दुर्दैव आहे.
या संस्थेचे स्थलांतर होवू नये यासाठी मी पुढाकार घेणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तातडीने पत्र व्यवहार करत आहे. व्ही.आर.डी.ई चे स्थलांतर रद्द होई पर्यत शांत बसणार नाही. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी घाबरून जावू नये, यातून नक्की मार्ग निघेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.
व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्था नगरमधून स्थलांतरित होण्यास स्थगिती मिळावी या मागणीचे निवेदन व्ही.आर.डी.ई मधील विविध कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीप गांधी यांना देवून या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले.
यावेळी कर्मचारी कार्य समितीचे सह सचिव आर.बी. खरमाळे, उपाध्यक्ष व्ही.एम.वायकर, व्ही.आर.डी.ई कामगार युनियनचे अध्यक्ष शंकर पगार, सचिव सलीम अहमद, कीर्तीरथ कुरेशिया, व्ही.आर.डी.ई एसटीए असोशिएशनचे अध्यक्ष पी.जी.पराशर,
व्ही.आर.डी.ई अॅडमीन असोशिएशनचे अध्यक्ष आर.एल.स्वामी, ड्रायव्हर असोशिएशनचे अध्यक्ष ई.जी.घोडे आदी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्थेत भारताच्या सशस्त्र सेनेला लढण्यासाठी लागणारी शस्त्रे, रणगाडे, मिसाईल लॉंचर, बुलेटप्रुफ वाहने, प्रोटोटाईप, ड्रोनइंजिन आदी उपलब्ध करून देते आहे.
भारताला आत्मनिर्भर करण्यात व्ही.आर.डी.ईचा मोलाचा वाटा आहे. व्ही.आर.डी.ई मध्ये सध्या वैज्ञानिक, अधिकारी, व कार्माचारी मिळून सुमारे ५०० नागरिक कार्यरत आहेत. तसेच ४०० स्थानिक कर्मचारी कराराने व १०० शिकवू कर्मचारी कार्यरत आहेत.
जवळपास १००० कुटुंबांचा उदार्निवाह व्ही.आर.डी.ई च्या माध्यमातून होत आहे. स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार देणारीही संस्था आहे. हजारोंची पोशिंदा असलेली ही संस्था बंद पडणे नगर साठी हानिकारक आहे.