शेततळ्यात बुडाल्याने नातवासह आजोबाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावातील पिंपळमळा परिसरात घडली.
शिवाजी सोनवणे (वय ६६) व समर्थ नितीन सोनवणे (वय ३) असे मृत्यू पावलेल्या आजोबा व नातवाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल गुरुवारी दुपारी शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील तळ्यालगत औषध फवारणी करत होते.
घरी पाहुणे आले म्हणून त्यांचा ३ वर्षांचा नातू समर्थ हा त्यांना बोलाविण्यासाठी शेततळ्याजवळ आला होता. शेततळ्याजवळ खेळत असताना तो तळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी आजोबा शिवाजी सोनवणे यांनीही तळ्यात उडी मारली; मात्र ते नातवाला वाचवू शकले नाही. या घटनेमध्ये बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच सोनवणे यांचा मुलगा नितीन याने आसपासच्या नागरिकांना या घटनेची माहिती दिली. परिसरातील ग्रामस्थ त्वरित घटनास्थळी पोहोचले. या ग्रामस्थांच्या मदतीने वेल्हाळे परिसरातील घटना स्थळी आजोबा व नातवाला शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या मृत्यूची खबर दिली. शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.